शहराची वाटचाल ड्रोन हब होण्याच्या दिशेने

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ऑटो आणि ईव्ही हब म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर आता शहराची वाटचाल देशातील प्रमुख ड्रोन हब होण्याच्या दिशेने सुरू झाली आहे. शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्रातील (ऑरिक) बहुप्रतिक्षित 'ड्रोन सिटी' प्रकल्पाच्या कामाला अधिक गती देण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे आगामी काळात छत्रपती संभाजीनगर हे देशातील ड्रोन उत्पादन, संशोधन आणि नवोन्मेषाचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येणार असून, यामुळे औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
ऑरिकमधील प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यात ड्रोन उद्योगाला चालना देण्यासाठी आणि उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत नुकतीच उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत ड्रोन उद्योगाच्या विकासासाठी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणे, शासकीय योजनांची माहिती थेट उद्योजकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करणे यासाठी अॅड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष 'टास्क फोर्स'ची स्थापना करण्याची
घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ड्रोन क्षेत्रातील संशोधन व विकास, स्वदेशी घटकांची निर्मिती, उत्पादन चाचणी, पेटंट आणि शासकीय अनुदानाच्या सर्व तरतुदी एकाच छताखाली आणण्यासाठी पॉलिसी ऑफ पॉलिसीज तयार करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली. शहरामध्ये ड्रोन क्लस्टर स्थापन करण्यासाठी सीएमआयएकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे संभाजीनगरचा औद्योगिक विकास वेगाने होईल आणि हे शहर देशाच्या ड्रोन नकाशावर अग्रस्थानी येईल, असा विश्वास सीएमआयएचे अध्यक्ष अथर्वेशराज नंदावत यांनी व्यक्त केला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions